भक्तीचा महापूर

दि. २८ (पंढरपूर)

लाखो वारकर्‍यांची गर्दी.. टाळ मृदंगाचा गजर ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष.. ढगाळ वातावरण.. अधून-मधून पडणारे पावसाचे बारीक थेंब..आणि पंढरपूर जवळ आल्याचा वारकर्‍यांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहणारा आनंद.. अशा आल्हाददायी व भक्तीपूर्ण वातावरणामध्ये संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याचे गोल व उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले.

आळंदीहून पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा, काल भंडीशेगावी होता. दररोज सकाळी पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी प्रस्थान सकाळी ६ वा. करीत असतो. मात्र भंडीशेगाव ते वाखरी हे अंतर अतिशय कमी असल्याने मान-पान जेवणावळीचा आस्वाद घेऊन दुपारी बाराच्या दरम्यान प्रस्थान केले. दुपारी ४ वाजता सोहळा बाजीराव विहीर येथे दाखल झाला. सर्वात मोठे व शेवटचे गोल रिंगण अशी ख्याती असलेला रिंगण सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भाविक आले होते.

पालखी या ठिकाणी येताच प्रमुख पालखी मार्गावर दुतर्फा वारकरी एका रांगेत उभे राहिले. यावेळी माउली व सवारींच्या अश्‍वांनी पहिल्या दिंडीपासून रथाच्या पाठीमागील २0 नंबरच्या दिंडीपर्यंत धाव घेतली. नंतर चोपदार बाळासाहेब, राजाभाऊ, रामभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली रिंगण आखून दिले. साडेचार वाजता अश्‍वांचे रिंगणस्थळावर आगमन झाले आणि वैष्णवांच्या उत्साहाला उधाण आले. त्यापाठोपाठ झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी मानाच्या दिंड्यांनी एकापाठोपाठ मैदानात येत मैदानाला वेढा मारत रिंगण सोहळ्यात नवा उत्साह निर्माण केला.

सहा लाख भाविकांच्या उपस्थितीत रंगला माउलींचा रिंगण सोहळा

पंढरीची वारी… ही परंपरा आहे शेकडो वर्षांपूर्वीची. दरवर्षी पावसाच्या तोंडावर लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांच्या पालखीत सामील होतात… आणि देहू-आळंदी, ते पंढरपूर असा पायी प्रवास करतात.. सोबतीला असतात टाळ-मृदूंग. इथे अभंग आणि किर्तनाचा मेळा भरतो. अडीचशे किलोमीटरची वाट सहज-सोपी होऊन जाते..मुखी संतानी दिलेली मानवतेची शिकवण असते. याच संतांच्या मांदियाळी वारीतल्या स्त्रियांना विठ्ठल कसा भावतो, संत स्त्रिया आणि विठ्ठलाचं काय नातं आहे…. याची वारी आम्ही केली…माझे माहेर पंढरी..!!