Waari 2012 More

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील क्षणचित्रे

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील काही प्रसंग.

1.वारी – महर्षी वाल्मिकी ऋषींची तपोभूमी वाल्हेनगरीत समाजआरतीमध्ये माऊली सोहळ्याचे विश्‍वरूपदर्शन अनुभवले

2.  वारी   या दिव्याच्या घाटात, माऊली निघाली थाटात… याचा प्रत्यक्षात अनुभव घेत लाखो वैष्णवजनांसह माऊलींच्या पालखीने दिवेघाटाची अवघड चढण लीलया पार केली. पुणे ते सासवड हा सर्वांत मोठा टप्पा, अवघड दिवेघाटाची चढण, डोक्यावर तळपणारा सूर्य, घामाच्या धारा आणि एकादशीचा उपवास या सर्व अडचणींवर मात करत वारकर्‍यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत मोठय़ा थाटात सासवड गाठले

3. वारी – संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीत मृदंग वाजवत मनोरा चढविताना वारकरी

4. वारी – संत तुकाराम महाराजांचा गजर करत पालखी सोहळ्य़ातील भाविक मोठय़ा आनंदाने वळणदार रोटी घाट पार करताना

5.  वारी – ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळ्याचे रविवारी खंडोबानगरी जेजुरीत आगमन झाले. गडावर दर्शनासाठी वारकर्‍यांनी गर्दी केली होती

6.  वारी – संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातून बारामती तालुक्यात दाखल झाला. तेव्हा भाविकांनी उत्साही स्वागत केले

Date 19 June 2012   Courtesy :  Lokamat Marathi Paper

तुकोबांच्या पालखीचे इंद्रपुरीत अश्‍वरिंगण

इंदापूर। दि. २३ (वार्ताहर)

लाल मातीवर शुभ्र पांढर्‍या रंगाच्या कडा उठून दिसत होत्या. त्यावर भगव्या पताका, टाळ- मृदंगाच्या नादात ‘तुकोबा’च्या जयघोषात पालखीच्या मानाच्या अश्‍वाने गोल रिंगण पूर्ण केले. हा अभूतपूर्व सोहळा इंदापूरकरांनी ‘याची देही याची डोळा’ लक्ष लक्ष नयनांनी अनुभवला.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन इंद्रपुरीनगरीत ११ वाजून १५ मिनिटांनी झाले. रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात फटाके, तोफांच्या आतशबाजीने पालखीचे स्वागत झाले. याच शाळेच्या प्रांगणात गोल रिंगण सोहळा पार पडला.

सर्वप्रथम पालखीच्या नगार्‍यांचे आगमन झाले. त्यापाठोपाठ अब्दागिरीसह भालदार – चोपदार आले. तुळशीवाले, हंडावाले, विणेकरी, टाळकरी, पताकावाले, पखवाजवाले यांच्यासह देहूच्या प्रमुख दिंड्यांचे आगमन झाले. त्यानंतर रथातून पालखी खांद्यावर घेऊन ग्रामस्थांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केली. पावले खेळत दिंड्यांनी ‘तुकोबा- माउली’चा जयघोष सुरू केला. तुळशी वृंदावन, हंडेकर्‍यांनी रिंगणात दौड घेऊन पहिले रिंगण पूर्ण केले. त्यानंतर टाळकरी, विणेकर्‍यांनी प्रदक्षिणा घालत रिंगण पूर्ण केले. त्यानंतर पालखीच्या मानाच्या बाभूळगावकर्‍यांच्या अश्‍वाने प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली, तसे आमदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या अश्‍वावर भालदार आरूढ झाला अन् वार्‍याच्या वेगाने अश्‍वाने तीन प्रदक्षिणा पूर्ण करीत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले.रिंगण सोहळा पार पडल्यानंतर अबालवृद्धांनी फुगडी, इतर खेळ खेळले. रिंगण झाल्यानंतर पालखी श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या प्रांगणात विसावली. तेथेही दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. उद्या  (रविवारी 24/6) पालखी सोहळा सराटीकडे प्रस्थान ठेवणार आहे.

 दि. २५ (माळशिरस)                          

नाचत जाऊ त्याच्या गावा।

खेळीया रे सुख देईल विसावा।।

सदाशिवनगर येथील शंकर कारखान्याच्या मैदानात संत ज्ञानेश्‍वर माउली पालखी सोहळ्याच्या गोल रिंगण सोहळ्यात अश्‍वांनी नेत्रोद्दीपक दौड करून लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

दुपारी अडीच वाजता पालखी व दोन्ही अश्‍वांचे मैदानात आगमन झाले. माजी जि.प. सदस्या पद्मजादेवी मोहिते-पाटील व शंकर कारखान्याचे अध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते माउलींच्या अश्‍वांचे पूजन करण्यात आले. या वेळी उच्च तंत्रज्ञान मंत्री राजेश टोपे, मनसेचे आ. राम कदम हेही उपस्थित होते. याप्रसंगी चोपदारांनी रिंगण लावून अश्‍वांची मैदानातून एक फेरी मारली. माउलीच्या अश्‍वाला चोपदारांनी धरून एक फेरी मारली. यानंतर दोन्ही अश्‍वांनी वायुवेगाने दोन फेर्‍या मारल्या.

पहिल्यांदाच शितोळे-सरकारांची उपस्थिती

गतवर्षी सदाशिवनगर येथील रिंगण सोहळा रद्द झाला होता. यामुळे या वर्षी या रिंगण सोहळ्यासाठी शंकर कारखान्याने जय्यत तयारी केली होती. या रिंगण सोहळ्यासाठी प्रथमच श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे-सरकार उपस्थित होते.

चोपदाराला न जुमानता अश्‍वांची दौड..

गतवर्षी रिंगण सोहळा रद्द झाला होता. परंतु या वर्षी लोणंद येथील मुक्कामी पालखी संस्थानची बैठक व रिंगण सोहळा घेण्याचा निर्णय झाला. परंतु, अश्‍व न पळवता हातात धरून रिंगण घेण्याचा निर्णय झाला. रिंगण सोहळा सुरू होताच अश्‍वांनी चोपदारांचा हात सोडून सुसाट वेगाने रिंगण पूर्ण केले.

अकलूजमध्ये रंगले तुकोबांचे गोल रिंगण

राजीव लोहोकरे। दि. २५ (अकलूज)

सावळे सुंदर रूप मनोहर।

राहो निरंतर हृदयी माझे।।

आणिक काही इच्छा आम्हा नाही जाण।

तुझे नाम गोड पांडुरंगा।।

जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चौथे गोल रिंगण येथे उत्साहात रंगले. टाळ-मृदंगाच्या गजरात व ज्ञानोबा-तुकाराम असा नामघोष करीत पुणे जिल्ह्यातून नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात सराटी पुलानजीक स्वागतासाठी उभारलेल्या मंडपाजवळ सोहळा सकाळी ८ वाजता पोहोचला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात वैष्णवांच्या चेहर्‍यावर पंढरीच्या घरच्या जिल्ह्यात आल्याचे समाधान प्रगटले होते. पंढरी अवघ्या चार दिवसांवर आल्याने सोहळ्यात एकूणच उत्साह संचारला आहे.

सोहळ्यातील आजचा चौथा रिंगण सोहळा सुमारे तासभर रंगला. सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात शिक्षण प्रसारक मंडळाने रिंगणासाठी बांबूचे कम्पाउंड करून उत्तम व्यवस्था केली होती. प्रांगणाच्या मध्यभागी उभारलेल्या मंडपात पालखी विसाव्यासाठी ठेवण्यात आली. रिंगण सोहळ्यापूर्वी पताकाधारी वारकरी, तुळस घेतलेल्या महिला आणि पाठोपाठ वीणेकरी यांनी दोन धावा घेतल्या. साडेदहाच्या सुमारास अश्‍व रिंगणाच्या जागेत आणले. अश्‍वाने चालत एक फेरी पूर्ण केल्यावर पादुका दर्शनासाठी मंडपामध्ये नेण्यात आल्या. यानंतर मोहिते-पाटील यांच्या चेतक, सरकार, पिंटू या तीन अश्‍वांची पूजा करण्यात आली. यानंतर रफिक तांबोळी यांचा एक अश्‍व व त्यापाठोपाठ मोकळा अश्‍व वेगाने धावले. त्यांनी चार प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अश्‍वांच्या टापांखालील माती मस्तकी लावण्यासाठी वारकरी, ग्रामस्थ गर्दी करीत होते. असा हा नेत्रोद्दीपक रिंगण सोहळा संपताच नागरिक, वारकर्‍यांनी एकाच वेळी गर्दी केली. त्यानंतर पालखी सोहळा प्रमुख व दिंडीकरांचा सत्कार करण्यात आला.

 

रिंगण संपताच पालखी रथात ठेवण्यात आली. ती सदुभाऊ चौक, ग्रामपंचायत कार्यालयासमोरून विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. तेथे पोहोचल्यावर आरती करण्यात आली. यानंतर पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुणे जिल्ह्यातून नीरा नदी ओलांडून सोलापूर जिल्ह्यात सराटी पुलानजीक आगमन झाले खरे; मात्र, नदी कोरडी असल्याने भाविकांना स्नान करता आले नाही. अखेर, नदीतील डबक्यात टँकरने पाणी सोडण्यात आले आणि मग वारकर्‍यांनी स्नान केले.